Maharashtra Rain : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची विश्रांती पाहायला मिळत होती. पण आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे आणि यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. या कमी दाबक्षेत्रामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासात पावसाचे चांगले रौद्ररूप नजरेस पडले आहे.
काही ठिकाणी जास्तीच्या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आले आहेत. पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महत्वाचे म्हणजे आगामी काही दिवस असेच वातावरण कायम राहणार आहे.
यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर त्या संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
कुठं बरसणार मुसळधार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने आज विदर्भातील काही भागासाठी अतिदक्षतेचा आणि खानदेश तसेच मराठवाड्यातील काही भागासाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे.
आज विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर सदर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच आज, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नगर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील जालना, नांदेड, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
शिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, पुण्यात, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियाला विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खरंतर गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे असे रुप पाहायला मिळाले होते. मात्र ऑगस्टच्या शेवटी पावसाचा जोर कमी झाला. दरम्यान आता एक सप्टेंबर पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
काही भागांमध्ये 31 ऑगस्ट च्या मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काही दिवस पावसाचेच राहणार आहेत.