Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. खरेतर गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. हवामानात होत असलेल्या अमुलाग्र बदलांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे चित्र आहे.
कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी, कधी गारपीट तर कधी दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी राजा पूर्णपणे बेजार झाला आहे. शेतीमधून चांगली कमाई होत नसल्याने शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. गेल्या वर्षी मानसून काळात अपेक्षित असा पाऊस झाला नाही.
अनेक भागांमध्ये यामुळे दुष्काळाची झळ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जिथे मान्सून काळात चांगला पाऊस झाला होता तिथे अवकाळीच त्राहिमाम सुरूच आहे.
अवकाळी पावसामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वाया गेले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके अतिशय महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. येत्या काही दिवसात रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा पिकांना मोठा फटका बसत आहे.
गेली दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यात जोरदार अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आयएमडीने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, देशाच्या पर्वतीय भागात हिमवृष्टी होत आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडून थंडगार वारे राज्याच्या दिशेनं वाहत आहेत.
याचा परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये IMD ने ढगाळ हवामानाची शक्यता वर्तवली आहे. तसेच येत्या ४८ तासांत राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसणार असे आयएमडीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
आयएमडीने म्हटल्याप्रमाणे, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष सावध आणि सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.