Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.
वादळी पावसाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हजेरी लावली आहे. अशातच, आता भारतीय हवामान विभागाचा एक नवीन अंदाज समोर आला आहे.
भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहणार आहे.
आज राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे.
दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने सध्या राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार होत असून अनेक ठिकाणी वादळी पाऊस पाहायला मिळत आहे. आज देखील राज्यातील काही भागात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना येल्लो लट जारी करण्यात आला आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असा अंदाज आहे.
तर राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका कायम राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज राजधानी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे.
राज्यातील अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 9 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
खरतर जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रात वादळी पावसाची हजेरी लागत आहे. गारपीट देखील होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून अगदी आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.