Maharashtra Rain : गेल्या काही महिन्यांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अर्थातच जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत खूपच कमी पाऊस झाला. महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे मान्सूनोत्तर पाऊस वाढला आहे.
मान्सूनोत्तर पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुरुवातीला कमी पावसामुळे खरीप हंगामातून अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. यानंतर मान्सूनोत्तर पाऊस झाला आणि यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले.
शिवाय आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, मात्र यावर्षी थंडीचा जोर फारसा वाढलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस थोडीशी थंडी वाढली होती. मात्र तेवढा काळ वगळला तर यावर्षी थंडीचा जोर फारच कमी राहिला आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यात थंडीचा जोर कसा राहणार, फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस पडणार की नाही याबाबत सविस्तर अशी माहिती दिलेली आहे.
काल अर्थातच एक फेब्रुवारी 2024 ला हवामान खात्याने फेब्रुवारी महिन्यातील हवामाना संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिले आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, देशात फेब्रुवारीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.यामुळे थंडीचा जोर कमी राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे.
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
IMD ने म्हटल्याप्रमाणे या चालू फेब्रुवारी महिन्यात देशात ११९ टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस हजेरी लावणार आहे. फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण देशात सरासरी २२.७ मिलीमीटर पाऊस पडतो.
चालू फेब्रुवारी महिन्यात मात्र यापेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात दरवर्षी पावसाचे प्रमाण अधिक म्हणेज ६५ मिलीमीटर असते. यावर्षी सुद्धा उत्तर भारताकडे अधिक पाऊस पडेल असे वाटत आहे.
राज्यातील पावसासंदर्भात बोलायचं म्हटलं तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.