Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुरू असणाऱ्या अति मुसळधार पावसाने गेले काही दिवस झालेत विश्रांती घेतली आहे. खरेतर मध्यंतरी राज्यात झालेल्या अतिजोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार झाली होती. अनेक भागांमध्ये पाणी शिरले होते. कोल्हापूर, पुणे तसेच कोकणात आणि विदर्भात अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता.
राजधानी मुंबईची तुंबई झाली होती. पूरस्थितीमुळे अनेक शहरांमधील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले होते, याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पण आता गेल्या काही दिवसांपासून अति मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे.
मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने 31 जुलै पासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार एक ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
तसेच काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना येलो आणि कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
आज अन उद्या या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस
आज विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये, उत्तर कोकणातील ठाणे, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या एक ऑगस्ट रोजी दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना, कोकणातील ठाणे, मुंबईला जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
2 अन 3 ऑगस्टला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
दोन ऑगस्टला दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई सह संपूर्ण उत्तर कोकण, उर्वरित विदर्भ, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव आणि लातूर वगळता संपूर्ण मराठवाडा विभागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
3 ऑगस्टला मुंबई वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांना, मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक, पुणे, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित विदर्भ, उर्वरित मराठवाडा, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे.