Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसाबाबत. मिळालेल्या माहितीनुसार यंदा दिवाळीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात वरूणराज्याची हजेरी पाहायला मिळणार आहे. वरूणराजा दिवाळीच्या आनंददायी वातावरणात मनसोक्त बरसणार असा अंदाज समोर आला आहे.
खरंतर, दरवर्षी दिवाळीच्या काळात कमी-अधिक प्रमाणात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी लागते. अशा परिस्थितीत येत्या चार दिवसात दिवाळीला सुरुवात होणार असल्याने शेतकरी बांधवांच्या माध्यमातून यंदा दिवाळीच्या काळात पाऊस बरसणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पण दिवाळीच्या काळात बरसणारा हा पाऊस अवकाळी पाऊस असतो. अवकाळी पाऊस नेहमीच शेती पिकांसाठी घातक ठरला आहे. मात्र यंदा परिस्थिती काहीशी बिकट आहे.
यंदा मान्सून काळात चांगला पाऊस बरसला नसल्याने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची आतुरता लागलेली आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना आता पावसाची गरज आहे.
अशातच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे. खरंतर राज्यातील 40 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्यात आगामी काही दिवस जर अवकाळी पाऊसही बरसला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनणार आहे.
अशातच मात्र राज्यात आता अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्यांना यामुळे दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोणत्या भागात बरसणार पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार पाच नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील सिधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातही हलका पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
याशिवाय, 6 नोव्हेंबर रोजी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच 7 नोव्हेंबर रोजी कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
तसेच 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसाचा शिडकावा होऊ शकतो असा हवामान अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. यामुळे आता हवामान खात्याचा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे बारीक लक्ष लागून राहणार आहे.