Maharashtra Rain : सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे मानसूनकडे लक्ष आहे. मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरात वेगाने प्रगती करत असून लवकरच केरळात दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे म्हणजेच रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली असून मान्सूनचा प्रवास जलद गतीने सुरू आहे. मान्सून 31 मे 2024 ला केरळला दाखल होणार असा अंदाज आहे.
तसेच दहा जूनच्या सुमारास कोकणासहित मुंबईत मान्सून पोहोचणार अशी माहिती आयएमडीच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच 15 मे च्या सुमारास पुणे, अहमदनगर, नाशिक समवेतच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अन विदर्भ आणि मराठवाड्यात दाखल होणार असे म्हटले जात आहे.
तथापि, हे चक्रीवादळ निवळल्यानंतरच मान्सूनच्या पुढील प्रवासाची दिशा आणि दशा समजेल अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, मात्र 10 जूनच्या सुमारास मान्सूनचे आपल्या महाराष्ट्रात आगमन होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र तत्पूर्वी राज्यात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राजधानी मुंबईत आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. आगामी 24 तास या भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असे आय एम डी ने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे. दरम्यान, काल विदर्भात वादळी पावसाची जोरदार बॅटिंग झाली आहे. अचानक आलेल्या वादळामुळे विदर्भातील चार जिल्ह्यात मोठ नुकसान झालंय.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ विभागातील अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या उन्हाळी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या वादळाचा मोठा फटका बसला असून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पीक डोळ्यादेखत वादळामुळे वाया गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडलेत. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत मान्सून आधीच महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे.