Maharashtra Rain : एक ते तीन सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला होता. काही ठिकाणी अक्षरशा अतिवृष्टी सारखा पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला.
यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसम पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव जिल्ह्यात पावसाची तीव्रता फार अधिक होती.
मराठवाड्यातील परभणी सह बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार दणका दिला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मात्र, गेल्या चार दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. अशातच, आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात आजपासून अर्थातच गणरायाच्या आगमनापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत गणेशोत्सवाच्या प्रारंभी जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता आहे. ७ ते ९ सप्टेंबरदरम्यान मुंबई महानगर प्रदेशालाही पाऊस तडाखा देईल असा अंदाज आहे. १२ ते १७ सप्टेंबर या सहा दिवसांत एमएमआरमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे.
आज पासून सोमवार पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. फक्त कोकणातच नाही तर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा या कालावधीत जोरदार पावसाची शक्यता आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवारी पूर्व राजस्थान, गुजरातचा काही भाग आणि महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्रातला घाट माथ्याच्या परिसरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत श्री गणेशाच्या आगमन सोहळ्या वेळी महाराष्ट्रात काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.