Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसर आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र असे असले तरी अजूनही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञांनी आगामी काही दिवस महाराष्ट्राचे हवामान कसे राहणार कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितल्याप्रमाणे, गुरुपौर्णिमेपर्यंत अर्थातच 21 जुलै पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत राज्यातील कोकण,विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खांदेश अन मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खरं पाहता, राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, खरीप हंगामातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या असल्या तरी देखील पीक वाढीसाठी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
एक तर गेल्या महिन्यात अर्थात जून महिन्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा राज्यात पावसाचा जोर फारच कमी होता. जुलैच्या पहिला आठवडा हा जवळपास कोरडा गेला.
यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची चिंता वाढली. पण आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे तसेच काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे.
दरम्यान आगामी पाच दिवस अर्थातच 21 जुलै पर्यंत म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यातील तज्ञांनी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै पर्यंत मुंबई सह कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
याशिवाय विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये अर्थातच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच संपूर्ण खानदेश म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर म्हणजे संपूर्ण पुणे विभाग आणि नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.