Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन मध्ये अवकाळी पाऊस खोडा आणू शकतो, कारण की, सरत्या वर्षात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा मोठा विचित्र खेळ पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली.
दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून थंडीचा जोर वाढत असतो मात्र यंदा नोव्हेंबर मध्ये थंडीचा जोर फारसा वाढला नाही. शिवाय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात अवकाळी पाऊस बरसला.
या काळात बरसलेल्या अवकाळी पावसाची तीव्रता कमी होती मात्र पावसाळी वातावरणामुळे अपेक्षित अशी थंडी पडत नव्हती. पण आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असल्याने तसेच जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये बर्फवृष्टी होत असल्याने याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे आणि यामुळे थंडीचा जोर वाढला आहे.
अशातच आता भारतीय हवामान विभागाने या चालू वर्षाच्या शेवटी आणि येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे सांगितले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या अखेरीस वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि यामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस बरसणार आहे.
IMD नुसार, पूर्वेकडील काही राज्यात, तसेच तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.
आपल्या महाराष्ट्रातही रिमझिम पाऊस पडू शकतो. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत या संबंधित भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय, उत्तर-पश्चिम आणि लगतच्या मध्य भारतातही या कालावधीत हलका पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या बुलेटिनमध्ये स्पष्ट केले आहे.