Maharashtra Rain Alert : येत्या दोन दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात 15 ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या राष्ट्रीय सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
तसेच सर्व शासकीय कार्यालयात, शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम राहणार आहे. खरंतर गेल्या वर्षी 15 ऑगस्टला राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी तर भरपावसात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला होता. यंदा मात्र ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत एकदाही जोरदार पाऊस झालेला नाही.
गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे राज्यातील ज्या भागात जून महिन्यात चांगला पाऊस झाला नव्हता तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु आता ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे.
येत्या दोन दिवसात या चालू महिन्याचा पहिला पंधरवाडा संपेल मात्र तरीही जोरदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी ज्याप्रमाणे 15 ऑगस्टला जोरदार पाऊस झाला होता तसा पाऊस यंदाही पडेल का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
याबाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून देखील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाचा जोर आता केव्हा वाढणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून 20 ऑगस्टपर्यंत म्हणजेच 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड राहणार आहे.
या कालावधीत मुंबईसह कोकणात थोडाफार पाऊस पडेल मात्र उर्वरित राज्यात कुठेच पाऊस पडणार नसल्याचे चित्र आहे. मात्र 21 ऑगस्ट नंतर राज्यात पावसाची शक्यता आहे. 21 ऑगस्ट नंतर राज्यातील बहुतांशी भागात श्रावण सऱ्या बरसतील असा अंदाज आहे.
पण जुलै महिन्याप्रमाणे या चालू महिन्यात जोरदार पाऊस होणार नाही, केवळ मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांना जोरदार पावसाची आवश्यकता आहे. अशा स्थितीत 20 तारखेनंतर कसा पाऊस पडतो यावरच आता खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार असे सांगितले जात आहे.