Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात गेल्या 14 ते 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. जवळपास एक पंधरवाडा झाला तेव्हापासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र कुठेच पाऊस पडत नाहीये.
सध्या राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांना आता पाण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली असल्याने ही दुष्काळाची चिन्हे तर नाहीत ना अशी भीतीही शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसा संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या तीन ते चार दिवसात राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा विभागात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
17 ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळेल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
यासोबतच हवामान विभागाचे जेष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी आगामी काही दिवस राज्यात कस हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे आता मान्सूनचा आस पोषक स्थितीवर येत असून कमी दाबाचा पट्टा दोन दिवसात सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे.
यामुळे आता राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. राज्यात आता पावसाला सुरुवात होणार आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे तसेच विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
तसेच उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या पंधरा दिवसात पहिल्यांदाच हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच येत्या काही दिवसात पावसाचा आणखी जोर वाढेल अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार उद्या अर्थातच १७ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील नांदेडमध्ये तर 18 व 19 ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजी महाराज नगर व नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.