Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान खात्याने गेल्या महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले होते. यानुसार देशातील विविध भागांमधून नैऋत्ये मोसमी वारे अर्थातच मान्सून परतला आहे. उत्तर भारतातून तसेच महाराष्ट्राच्या बहुतांशी भागांमधुन मान्सून माघारी फिरला आहे.
तर काही ठिकाणी सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. आपल्या राज्यातही काही भागात परतीच्या पावसाने हजेरी लावण्याची माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाली असून त्या ठिकाणी ऑक्टोबर हिटचा अनुभव येत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून या भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी 24 तासात देशातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
तसेच पुढील 2-3 दिवसांत कर्नाटकचा आणखी काही भाग आणि तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग येथून मान्सून माघारी फिरणार आहे. त्याशिवाय बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे.
आपल्या महाराष्ट्रातूनही मानसूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. आतापर्यंत राज्यातील विविध भागांमधून मान्सून माघारी फिरला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार निम्म्या महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह विदर्भ आणि मराठवाड्यातूनही मान्सून परतला आहे.
तसेच येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा अंदाज असून राज्यातील काही भागात परतीचा हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे.
खरंतर यावर्षी जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील विविध भागात पाण्याचे संकट तयार झाले आहे. काही ठिकाणी जनावरांसाठी चारा देखील उपलब्ध झालेला नाही. यामुळे येणारा रब्बी हंगाम देखील प्रभावित होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील काही भागातील शेतकरी बांधव चिंतेत आहेत.