Maharashtra Rain Alert : पाऊस पडत नव्हता म्हणून चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या कोसळत असलेल्या धुवाधार पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचे त्राहीमाम पाहायला मिळत आहे. काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होत आहे. यामुळे कोकणातील अनेक भाग जलमय झाले असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राजधानी मुंबईमध्ये लोकल सेवा पावसामुळे प्रभावित झाली आहे. सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी देखील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक भागात पूरस्थिती तयार होत असून या अतिवृष्टीमुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. यानुसार, राज्यात उद्या देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे. उत्तर कोकणातील पालघर आणि ठाणे तसेच दक्षिण कोकणातील रायगडमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे.
विशेष म्हणजे आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा राज्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साहजिकच संबंधित भागातील नागरिकांनी अधिक सावधानता बाळगणे जरुरीचे आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही भागात अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज आहे. तसेच उद्या म्हणजे 22 जुलै रोजी कोकणातील पालघर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विशेषता घाटमाथ्यावर अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. महारष्ट्रासह, गोवा, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छला देखील रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
यासोबतच येत्या काही तासात मुंबईमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अर्थातच 25 जुलै पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आय एम डी ने आपल्या निवेदनात व्यक्त केला आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते त्याचे रुद्र रूप सध्या पाहायला मिळत आहे.
यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी देखील काही शेतकऱ्यांचे या पावसाने अतोनात नुकसान देखील केले आहे. या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे तर काही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे आगामी काही दिवस नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.