Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान पाहायला मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी राजधानी मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज देखील राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट होणार तर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये वादळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या मान्सून पूर्व पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. आज राज्यातील उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात गारपीट होणार असा अंदाज आहे. एवढेच नाही तर राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यात वादळी पाऊस होणार?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खानदेशातील नंदुरबार वगळता उर्वरित दोन जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या 6 जिल्ह्यात, विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या 7 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार
आय एम डी ने आज उत्तर महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता आहे. यामुळे सदर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी आपल्या शेतीमालाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
या वादळी पावसाचा फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावे तसेच आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्यावी असे म्हटले गेले आहे.
मान्सूनचे आगमन वेळेआधीच होणार
यंदा मान्सून दोन दिवस आधी अंदमानात पोहोचणार आहे. साधारणपणे मान्सूनचे अंदमानात 21 मे च्या सुमारास आगमन होत असते. यंदा मात्र अंदमानात मान्सून 19 मे लाच दाखल होणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये देखील मान्सून एक जुन ऐवजी 29 मे पर्यंत दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे.