Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दुष्काळाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला ज्यावेळी मान्सूनचा प्रवास रखडला होता त्यावेळी 2023 मध्ये 1972 सारखा दुष्काळ पडणार अशा चर्चा रंगत होत्या. ग्रामीण भागात याविषयी उलट सुलट चर्चा सुरू होत्या. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते.
विशेषतः अमेरिकेच्या हवामान विभागाने यावर्षी भारतात कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. पण जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला. जुलै महिन्यात सर्व दूर जोरदार पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टी झाली, तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.
मात्र आता गेल्या 15 ते 16 दिवसांपासून पाऊस जणू काही गायब झाला आहे. राज्यात कुठेच मुसळधार पाऊस होत नाहीये. काल राज्यातील विदर्भ विभागात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला मात्र पावसाचा जोर म्हणावा तसा नव्हता. यामुळे राज्यात पुन्हा एकदा दुष्काळाच्या चर्चा रंगत आहेत. शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण तयार होत आहे.
अशातच मात्र काही हवामान तज्ञांनी यंदा दुष्काळ पडणार नसून समाधानकारक असा पाऊस पडणार असे मत व्यक्त केले आहे. यामध्ये पंजाबराव डख यांचा देखील समावेश होतो. डख यांनी यंदा राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यात आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काल राज्यातील विदर्भ विभागातील काही भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून आता येत्या काही दिवसात राज्यातील उर्वरित भागातही पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वाढत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी पूरक परिस्थिती आहे. शिवाय आता मान्सूनचा आस देखील त्याच्या मूळ जागेवर येणार आहे. या दोन्ही हवामान प्रणालीमुळे आता राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भ मराठवाड्याबरोबरच कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
येत्या चार दिवसात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अकोला तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, वर्धा, वासिम या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.