Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासहित देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढत आहे. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती.
अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तर भारतात खूपच जोरदार वारे वाहत आहेत.
मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यापासून ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
विशेष बाब अशी की, हवामान खात्याने मराठवाड्यातील चक्राकार वाऱ्यांपासून विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, या साऱ्या वातावरणीय प्रणालीमुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील जवळपास 13 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली असून या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
आयएमडीने म्हटल्याप्रमाणे आज राज्यातील विदर्भ विभागातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील पूर्व भागांमध्ये दोन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज पासून अर्थातच 25 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्रात पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे.
आज पूर्व मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी झाला आहे. यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी तज्ञ लोकांनी केले आहे.