Maharashtra Rain Alert : आज संपूर्ण देशभरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका देखील सुरू झाल्या आहेत. मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात गणपती विसर्जनासाठी अथांग जनसागर रस्त्यांवर उतरला आहे. मुंबईतील मानाचा लालबागचा राजाच्या विसर्जनाची मिरवणूक देखील सुरू झाली आहे.
19 सप्टेंबर पासून सुरू झालेला गणेशोत्सव आज समाप्त होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. गणेशभक्त लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांचे डोळे पानावले आहेत. दरम्यान गणरायाच्या आगमना बरोबर दाखल झालेला पाऊस आज देखील मनसोक्त बरसणार असे सांगितले जात आहे.
हवामान खात्याने आजपासून आगामी तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेश सह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांत जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
यासोबतच आज आंध्रप्रदेश, कर्नाटक, झारंखड, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
आज राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील या भागात कोसळणार मुसळधार
आज राजधानी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे तुफान बॅटिंग होणार असा अंदाज आहे. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल असे सांगितले गेले आहे. आज मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सातारा मराठवाड्यातील औरंगाबाद , नांदेड, आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय आज राज्यातील बीड, परभणी, सोलापूर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांमधील नागरिकांनी सावध राहणे अपेक्षित आहे. आज राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी मात्र आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.