Maharashtra Rain Alert : गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर, मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात जोरदार पाऊस झाला. मात्र मान्सून विदर्भाच्या वेशीत दाखल झाल्यानंतर म्हणजेच 12 जून नंतर पावसाचा जोर कमी झाला होता.
12 जून ते 22 जून या दहा दिवसांच्या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप होती तर काही ठिकाणी अगदी हलका ते मध्यम पाऊस पडत होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. काल 23 जूनला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
अशीच परिस्थिती मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही पाहायला मिळाली. याशिवाय कोकणात देखील जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 27 जून पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
24 जून ते 27 जून या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने संबंधित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान खात्याचा हा अंदाज थोडक्यात समजून घेणार आहोत.
काय म्हणाले भारतीय हवामान विभाग ?
24 जून : आज राज्यातील कोकण विभागातील दक्षिण भागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
तसेच मुंबई, पालघर, ठाणे, संपूर्ण विदर्भ, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
25 जून : उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
26 जून : 26 जूनला राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
27 जून : 27 जूनला राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.