Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून वारंवार काही ना काही बदल पाहायला मिळत आहेत. खरंतर, नोव्हेंबरचा महिना हा गुलाबी थंडीचा महिना असतो. या महिन्यात ऑक्टोबर हिटच्या झळा सोसून वैतागलेल्यांना गुलाबी थंडीची चाहूल लागते आणि आपसूकच त्यांची पाऊले कुठतरी दूर सहलीकडे वळतात. नोव्हेंबर महिन्यात अनेक जण सहलीचा प्लॅन आखत असतात.
कुठेतरी वीकेंड एन्जॉय करण्यासाठी जातात. तर काहीजण परिवारासमवेत ट्रीप काढतात. मात्र जर तुम्ही नोव्हेंबर महिना आहे, थँडीचा महिना आहे असे म्हणून विकेंडला कुठेतरी ट्रिप काढण्याचा प्लॅन बनवत असाल तर, थोडं दमानं घ्या ! कारण की आगामी काही दिवस तामिळनाडू आणि केरळसह आपल्या महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
हवामान खात्याने तसा अंदाजच वर्तवला आहे. यामुळे वीकेंडला ट्रिप काढण्यापूर्वी तुम्हाला हवामान खात्याचा हा अंदाज जाणून घेणे गरजेचे ठरणार आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीच्यापूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस झाला होता.
त्यावेळी झालेल्या पावसामुळे कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे देखील खूप मोठे नुकसान झाले. अशातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील किमान चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. विशेष बाब अशी की, हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने आगे कूच करत आहे.
परिणामी महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने महाराष्ट्राला इशारा जारी केला आहे. IMD ने सांगितल्याप्रमाणे आज 24 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असे आयएमडीने सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर यासंबंधीत जिल्ह्यांसाठी आजसाठी म्हणजे 24 नोव्हेंबरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान मुंबई महानगराच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. उद्या अर्थातच 25 नोव्हेंबरला दक्षिण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
दक्षिण आणि उत्तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मध्ये महाराष्ट्रात देखील काही भागात पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला सुद्धा अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने 27 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवला आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातून मात्र पावसाचं प्रमाण कमी होणार अस सांगितलं जात आहे. निश्चितच, आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे तसेच आपल्या कामाचे नियोजन करावे असा सल्ला देण्यात आला आहे. तथापि हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.