Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. मध्यंतरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र अजूनही असे अनेक जिल्हे आहेत जिथे जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी तथा शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे भारतीय हवामान खात्याने आजपासून पावसाचा जोर वाढणार असा नवीन अंदाज जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी 14 ते 15 तास महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाचे राहणार आहेत.
या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या माध्यमातूनच संबंधित जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होणार आहे.
तसेच तीन जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता आहे.
आज फक्त अन फक्त राज्यातील तीन जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार आहे. उर्वरित सर्व 33 जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस
आज पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरावर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तर जिल्ह्यातील उर्वरित भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असे आयएमडीने सांगितले आहे.
राजधानी मुंबई बाबत बोलायचं झालं तर आज मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
याशिवाय आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या अनुषंगाने या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे.
विदर्भात देखील काही ठिकाणी जोरदार आणि काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भ विभागासाठी मात्र आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.