Maharashtra Rain : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उसंत घेतली. तथापि संपूर्ण जुलै महिन्याचा विचार केला असता गेल्या महिन्यात महाराष्ट्रात खूप जोरदार पाऊस झाला. सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची नोंद करण्यात आली. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अर्थात जून महिन्यात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता.
यामुळे शेतकरी बांधव चिंतेत होते. जोरदार पाऊस कधी पडणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला मुसळधार पाऊस झाला असून यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली आहे.
पण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जसा पावसाचा खंड पडला तसाच खंड याहीवर्षी पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली.
मात्र तसे काही घडले नाही ऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाने गिअर पकडला. राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात ऑगस्टच्या सुरुवातीला चांगला जोरदार पाऊस झाला.
कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली. दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यदिनापर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे. दुसऱ्या पंधरवाड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अगदीच अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असेही आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
हवामानातील बदलामुळे १५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. पण, १५ ऑगस्टनंतर पाऊस पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.
१८ ते ३१ ऑगस्टदरम्यान दोनवेळा मुसळधार पाऊस कोसळू शकतो, काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी असा दावा केला आहे. शेट्टी यांच्या मते स्वातंत्र्य दिनापर्यंत मान्सून किंचित विश्रांती घेणार आहे.
परंतु त्यानंतर म्हणजेच ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात दोन वेळा मोठी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. परंतु त्यावेळी पावसाची तीव्रता किती असेल ? हे हवामानातील बदलावर अवलंबून असणार असे सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.