Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात अर्थातच धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात सकाळी गारठा जाणवत असून खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये बोचरी थंडीचा अनुभव आता नागरिकांना येतोय. खऱ्या अर्थाने राज्यात आत्ता कुठे गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे.
गुलाबी थंडीची चाहूल लागली म्हणून आता येत्या काही दिवसात हुडहुडी भरवणारी थंडीही येणार असे दिसते आहे. पण थंडीची तीव्रता वाढणार असे अपेक्षित असतानाच आता राज्याचे हवामान बिघडले आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे.
या अंदाजामुळे मात्र शेतकऱ्यांची काळजी वाढू लागली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दिवसाचे किमान तापमान हे दिवसेंदिवस कमी होत आहे. किमान तापमानात घट होत असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये सकाळी सकाळी गारठा जाणवतोय.
मात्र कमाल तापमान अजूनही म्हणावे तसे कमी झालेले नाही. त्यामुळे भर दुपारी राज्यातील काही भागांमधील नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. पण येत्या काही दिवसांनी राज्यात सर्वत्र थंडीची तीव्रता वाढेल आणि दिवसाचे कमाल तापमान देखील कमी होईल अशी शक्यता आहे.
या साऱ्या पार्श्वभूमीवरच आता हवामान खात्याचा नवा अंदाज समोर आला असून 14 आणि 15 नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जारी केला आहे.
या अंदाजात हवामान खात्याने गुरुवारी आणि शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलीये. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये अर्थातच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सोलापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या काळात पडू शकतो.
विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच सांगली जिल्ह्यातील काही भागात या काळात जोराचा पाऊस पडणार असे आयएमडीने आपल्या या नव्या बुलेटीन मध्ये स्पष्ट केले आहे.
पण हे जिल्हे वगळले तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडेच राहील थंडीची तीव्रता तिथे कायम राहील असेही आयएमडीने आपल्या या नव्या बुलेटीन मध्ये स्पष्ट केले असून इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी कोणतीच काळजी करू नये असे आव्हान कृषी क्षेत्रातील जाणकारांनी यावेळी केले.
एकंदरीत महाराष्ट्रात 13 नोव्हेंबर पर्यंत अर्थातच उद्यापर्यंत हवामान कोरडे राहील मात्र 14 तारखेला राज्याचे हवामान चेंज होईल आणि 14 आणि 15 नोव्हेंबरला राज्यात चांगला जोरदार पाऊस होईल असे दिसते. देशातील इतर राज्यांबाबत बोलायचं झालं तर भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून आगामी काही दिवस तिथे असच हवामान राहणार असे दिसते.
IMD ने असे सांगितले आहे की, तामीळनाडू, पुद्दूचेरी, कराईकल, केरळ याठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत तामीळनाडू, १४ नोव्हेंबरपर्यंत आंध्रप्रदेश, यानम आणि रायलसीमा, १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान केरळ, १४ नोव्हेंबरला किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात पावसाची शक्यता आहे.