Maharashtra Railway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा अधिक जलद गतीने विकसित होत आहे. यामध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यात विविध महामार्गांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. तसेच नवनवीन लोहमार्गांची देखील कामे केले जात आहेत.
मात्र काही कामे ही बऱ्याच वर्षांपासून रखडलेली आहेत. यामध्ये फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचा देखील समावेश होतो. या रेल्वे मार्गाचे काम जवळपास ब्रिटिश काळापासून प्रलंबित आहे. मात्र आता हा रेल्वे मार्ग लवकरच पूर्ण होणार आहे. कारण की महाराष्ट्र राज्य शासनाने या रेल्वे मार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
हा रेल्वे मार्ग आता महारेलकडून नाही तर रेल्वे मंत्रालयाकडून केला जाणार आहे. यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माढा मतदारसंघातील खासदार रंजीत सिंग निंबाळकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
निंबाळकर यांनी हा रेल्वे मार्ग येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण होऊ शकतो असा दावा केला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाने हा रेल्वे मार्ग महारेलऐवजी रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्द केला असल्याने राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
एकंदरीत या रेल्वेमार्गाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या फलटण आणि पंढरपूर भागातील नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांनी देखील स्वागत केले आहे.
कसा आहे रूटमॅप ?
फलटण ते पंढरपूर हा रेल्वे मार्ग तब्बल 105 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती. यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. तसेच या मार्गासाठीच्या खर्चाचा 50% वाटा केंद्रशासन आणि 50% वाटा राज्य शासन उचलणार असल्याचे ठरले होते. मात्र तदनंतर या मार्गासाठी कोणतीच हालचाल झाली नाही.
पण आता जानेवारी 2024 पासून या मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे. तसेच काम सुरू झाल्यानंतर मात्र 12 ते 16 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा मार्ग बांधून तयार होईल असा दावा केला जात आहे. खरंतर या संपूर्ण मार्गासाठी 1482 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यापैकी 921 कोटी रुपये महाराष्ट्र राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत.
खरंतर या मार्गासाठी ब्रिटिशांनीच जमिनीचे भूसंपादन केले आहे. यामुळे या मार्गासाठी जमिनीचे भूसंपादन करावे लागणार नसून आता थेट रेल्वे मार्गाची बांधणीच केली जाणार आहे. हा मार्ग फलटण, निंबलक, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरीमार्गे पंढरपूर असा तयार केला जाणार आहे.
या मार्गामुळे फलटण ते पंढरपूर हा प्रवास गतिमान होणार असून या भागातील एकात्मिक विकास या निमित्ताने सुनिश्चित होणार आहे. या मार्गामुळे या भागातील कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकास सुनिश्चित होणार आहे. हा मार्ग धार्मिक पर्यटनासाठी देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे.