Maharashtra Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशातील बहुतांशी भाग रेल्वेने जोडले गेले आहेत. तसेच, ज्या ठिकाणी अजून पर्यंत रेल्वे दाखल झालेली नाही तेही भाग रेल्वेने जोडले जात आहेत. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी सध्या रेल्वे मार्ग अस्तित्वात आहेत आणि ज्या रेल्वे मार्गांवर मोठा ताण आहे, प्रवासी संख्या अधिक आहे अशा रेल्वे मार्गांसाठी इतर पर्यायी रेल्वे मार्ग देखील उभारले जात आहेत.
पुणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी देखील महाराष्ट्रात एका नव्या रेल्वे मार्गाची उभारणी केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेता तळेगाव-उरुळी असा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या नव्या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. यामुळे हा अहवाल येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हा नवा रेल्वे मार्ग 70 किलोमीटर लांबीचा राहील आणि यासाठी 7,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा रेल्वे मार्ग विकसित झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी आशा आहे. यामुळे हा प्रकल्प पुणेकरांसाठी देखील महत्त्वाकांक्षी बनला आहे. हा मार्ग चाकण-रांजणगाव मार्गे जाणार आहे.
चाकण आणि रांजणगाव हे दोन भाग रेल्वेने जोडले जाणार असल्याने या भागातील उद्योगांना या मार्गाचा फायदा होणार आहे. पुणे लोणावळा आणि पुणे दौंड या मार्गावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक गाड्या धावत आहेत आणि याचा परिणाम म्हणून पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात ताण येतोय.
परिणामी रेल्वे बोर्डाने तळेगाव ते उरुळी दरम्यान नवीन मार्गिका टाकण्याचा विचार केला आहे. त्याचा ‘डीपीआर’देखील अंतिम टप्प्यात आहे. मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने हा ‘डीपीआर’ तयार केला असून, दोन महिन्यांत रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल.
हा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर झाल्यानंतर या प्रकल्पाच्या पुढील कामाला सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन वरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून रेल्वे प्रवाशांना या मार्गाचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.