Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या वर्षांमध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या नव्या वर्षात महाराष्ट्राला एका नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे काम या नव्या वर्षात होणार अशी आशादायी बातमी समोर येत आहे. या नव्या कॉरिडॉर चे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून येत्या काही महिन्यांनी हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा रेल्वे मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होईल आणि याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना फायदा होईल. या नव्याने विकसित होत असलेल्या रेल्वे मार्गावर मुंबई महानगरातील सर्वाधिक मोठा बोगदा देखील विकसित होणार असून हीच या रेल्वे मार्गाची सर्वात मोठी खासियत सुद्धा आहे.
मंडळी आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तर, कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे. यामुळे पनवेलहून कर्जतला जायचे असेल तर ट्रान्स हार्बर मार्गाने ठाणे स्टेशनला येवून पुन्हा मध्य रेल्वेवरील लोकल पकडावी लागते.
त्यामुळे प्रवाशांना पनवेल ते कर्जत दरम्यान चा प्रवास करताना अधिक वेळ लागतोय. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाया जातोच शिवाय ठाणे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पण आता नवीन कॉरिडोरमुळं पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट रेल्वे केनक्टिव्हिटी मिळणार आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पा अंतर्गत पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोर उभारला जात आहे. हा रेल्वे प्रकल्प 2,782 कोटींचा आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान थेट लोकल सेवा उपलब्ध होणार आहे. हा रेल्वे मार्ग 29.6 किलोमीटर लांबीचा राहील.
या मार्गावर एकूण तीन बोगदे तयार होतील आणि यातील एक बोगदा हा मुंबई महानगरातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जाईल. पनवेल – कर्जतदरम्यानच्या वावर्ले येथे 2.6 किमी लांबीचा बोगदा उभारला जात आहे. वावर्ले येथील हा बोगदा सर्वाधिक लांबीचा बोगदा राहणार आहे.
कर्जत-पनवेल दरम्यान सध्या एकेरी मार्ग अस्तित्वात आहे मात्र हा ट्रॅक मालगाडी व काही मेल एक्स्प्रेस ट्रेनसाठी वापरला जात आहे. पण सध्या सुरु असणाऱ्या नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय लोकल रेल्वे पनवेलमार्गे धावणार आहेत. हा मार्ग तयार झाल्यास सीएसएमटी-कर्जत मार्गे पनवेल हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होईल.