Maharashtra Railway News : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार राजधानी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काल मुंबईत खूपच मुसळधार पाऊस झाला असून आजही पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी अक्षरशः अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला पण कमी काळात जास्त पाऊस झाल्याने मुंबईकरांची अक्षरशः दाणाफान उडाली आहे.
काल रात्रभर राजधानी मुंबईत आणि उपनगरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम हा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर सुद्धा पाहायला मिळाला आहे.
मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलचे पूर्ण वेळापत्रक या पावसाने बिघडवले आहे. अनेक लोकल गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
फक्त लोकल गाड्याच नाही तर काही एक्सप्रेस गाड्या देखील रद्द झाल्या आहेत. मुंबई ते पुणे दरम्यानच्या एक्सप्रेस गाड्या देखील या अति मुसळधार पावसामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज सांस्कृतिक राजधानी वरून अर्थातच पुण्यावरून देशाच्या आर्थिक राजधानीकडे अर्थातच मुंबईकडे जाणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
एवढेच नाही तर मनमाड जंक्शन वरून मुंबईकडे येणारी एक गाडी आणि मुंबईवरून पुण्याकडे जाणारी एक गाडी आज रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
यामुळे मनमाडहुन मुंबईकडे आणि पुण्याहून मुंबईकडे तसेच मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण मुंबई ते पुणे दरम्यानच्या कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.
कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द होणार ?
मनमाडहुन मुंबईकडे येणारी १२११० – पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
पुणे ते सीएसएमटी दरम्यानची अन पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी सिंहगड एक्सप्रेस ( गाडी क्रमांक ११०१० ) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मुसळधार पावसामुळे १२१२४ – पुणे- सीएसएमटी- डेक्कन एक्स्प्रेस देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवाय ११००७ – पुणे – सीएसएमटी- डेक्कन एक्स्प्रेस देखील रद्द झाली आहे.
मुंबई पुणे दरम्यान धावणारी सीएसएमटी-पुणे – इंटरसिटी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२१२७) ही गाडी देखील रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.