Maharashtra Railway News : आज महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी भावाला बहिणी राखी बांधून तीच्या रक्षणाचे वचन आपल्या लाडक्या बंधू रायाकडे मागतात. यासाठी विवाहित बहिणी आपल्या भावाच्या गावी जातात. मात्र या रक्षाबंधनाला माहेरी जाणाऱ्यांना रेल्वेच्या मेगाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कारण की ऐन सणासुदीच्या दिवशी रेल्वे कडून तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेतला जात असून याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल आठ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळ लांब पल्ल्याच्या लूप मार्गासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे या मार्गावर धावणाऱ्या आठ गाड्या रद्द राहणार आहेत. यापूर्वी रेल्वेने 14 रेल्वे गाड्या या ब्लॉकमुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आता रेल्वेने केवळ आठ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते उद्या अर्थातच एकतीस ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. निश्चितच रक्षाबंधनाच्या सणाला माहेरी जाणाऱ्या सासरवासीयांना या निर्णयाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता आपण रेल्वेने नेमके कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत हे जाणून घेऊया.
कोणत्या गाड्या राहणार रद्द ?
- 29 ऑगस्टला लोकमान्य टिळक टर्मिनस ते बल्लारशाह दरम्यान धावणारी विशेष एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
- 30 ऑगस्टला धावणारी बल्लारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस देखील या ब्लॉकमुळे रद्द राहणार आहे.
- 30 ऑगस्ट रोजी धावणारी भुसावळ-वर्धा एक्स्प्रेसही रेल्वेने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या ब्लॉककरीता 31 ऑगस्टला धावणारी वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- 30 ऑगस्टला धावणारी पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेसही या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रद्द राहणार आहे.
- 31 ऑगस्टला धावणारी अमरावती-पुणे एसी एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.
- 31 ऑगस्ट रोजी धावणारी भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर गाडी सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
- 31 ऑगस्टला धावणारी बडनेरा-भुसावळ ही गाडी देखील मूर्तिजापूर स्थानकाजवळ घेतल्या जाणाऱ्या वाहतूक आणि पावर ब्लॉकमुळे रद्द करण्यात आली आहे.