Maharashtra Railway News : रेल्वे हे भारतात प्रवासासाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच उल्लेखनीय आहे. सणासुदीच्या काळात तर प्रवासी संख्या दुपटीने वाढत असते.
दरवर्षी दिवाळीच्या काळात राज्यातून धावणाऱ्या विविध रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. हेच कारण आहे की मध्य रेल्वेने दिवाळीच्या काळात नियमित धावणाऱ्या गाड्यांसोबतच काही अतिरिक्त विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता.
नाशिक ते बडनेरा दरम्यान देखील विशेष मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला होता. ही दिवाळी विशेष मेमू रेल्वे गाडी 19 नोव्हेंबर पर्यंत चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता.
मात्र या विशेष मेमू ट्रेनला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. हेच कारण आहे की मध्य रेल्वेने आता या विशेष गाडी बाबत एक अतिशय महत्त्वाचा आणि रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर असा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने या गाडीला मुदतवाढ दिली आहे. यामुळे नासिक ते बडनेरा आणि बडनेरा ते नाशिक या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
खरंतर शहरात स्थायिक झालेले चाकरमाने सणासुदीच्या काळात गावाकडे जात असतात. दिवाळीमध्ये देखील कामानिमित्त स्थायिक झालेले शहरातील नागरिक दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी गावाकडे गेले होते.
आता दिवाळीचा सण संपला असून पुन्हा एकदा गावाकडे गेलेला कामगार वर्ग शहराकडे येऊ लागला आहे. यामुळे विविध रेल्वे मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्या अजूनही हाउसफुल धावत आहेत.
नासिक ते बडनेरा दरम्यान चालवल्या जात असलेल्या विशेष मेमू ट्रेनमध्ये अजूनही मोठी गर्दी होत आहे.
याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने या विशेष मेमू ट्रेनला 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
म्हणजे आता गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा-नाशिक विशेष मेमू व गाडी क्रमांक ०१२११ नाशिक – बडनेरा विशेष मेमू गाडी 30 नोव्हेंबर पर्यंत धावणार आहे. परिणामी या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अस सांगितलं जात आहे.