Maharashtra Railway News : देशात नुकताच दिवाळीचा सण संपन्न झाला आहे. दीपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे. दिवाळीच्या काळात दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
यामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या दिवाळीच्या काळात अनेक मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालवल्या गेल्या होत्या. दरम्यान आता कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर देखील मध्य रेल्वेच्या माध्यमातून काही विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. खरंतर कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
दरम्यान कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वे तीन विशेष गाड्या चालवणार आहे.
या गाड्या आठ ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची नक्कीच मोठी सोय होणार असून भाविकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लातूर ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. याशिवाय मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी दरम्यानही विशेष गाडी चालवली जाणार आहे. आता आपण या दोन्ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसं राहणार लातूर पंढरपूर रेल्वे गाडीचे वेळापत्रक
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, १२ व १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी ७:३० वाजता ही विशेष गाडी सोडली जाणार आहे आणि पंढरपूर रेल्वे स्थानकावर दुपारी १२:५० वाजता पोहोचणार आहे. तसेच, पंढरपूर-लातूर ही विशेष ट्रेन दिनांक १२ व १३ नोव्हेंबरला पंढरपूर स्थानकावरून दुपारी १:५० वाजता सोडली जाणार आहे आणि लातूर रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७:२० वाजता पोहोचणार आहे.
मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी विशेष ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १० ते १४ नोव्हेंबरपर्यंत मिरज स्थानकावरून दुपारी ३:१० वाजता ही विशेष गाडी सोडली जाणार आहे आणि पुढे पंढरपूर स्थानकावर ५:३० वाजता पोहोचणार आहे, नंतर कुईवाडी स्थानकावर सायंकाळी ७ वाजता पोहोचणार आहे.
त्यानंतर कुईवाडी स्थानकावरून रात्री ९:२५ वाजता ही गाडी सोडली जाणार आहे, पुढे पंढरपूर रेल्वेस्थानकावर १०:२५ वाजता पोहोचणार आहे आणि मिरज स्थानकावर मध्यरात्री १ वाजता पोहोचणार आहे.