Maharashtra Railway News : संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून गेला आहे. सध्या ही गाडी देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर सुरू आहे.
आगामी काळात आणखी महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे.
अशातच राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर आणखी दोन हायस्पीड ट्रेन चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे विभागाने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. गेल्या महिन्यात याबाबतचे वृत्त समोर आले होते.
यानुसार मध्य रेल्वे विभागाने मुंबई ते छत्रपती संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद या दोन मार्गांवर ही गाडी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता या मार्गावर देखील ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली पहिली हाय स्पीड ट्रेन सुरू होणार असे सांगितले जात आहे.
निश्चितच रेल्वे बोर्डाने जर या प्रस्तावाला मान्यता दिली तर मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद हा प्रवास गतिमान होणार असून या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना देखील वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात किती गाड्या सुरू आहेत
सध्या राज्यात सहा वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदोर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर या सहा मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे या सहापैकी चार मार्ग मध्य रेल्वेचे आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते इंदोर हे मार्ग वगळता उर्वरित चार मार्ग मध्य रेल्वे विभागात येतात.
दरम्यान मुंबई ते संभाजीनगर आणि पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर मध्य रेल्वेच्या मार्गांवर एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेस कार्यान्वित होणार आहेत.