Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शंभर वर्षांहून अधिक काळाचा महाराष्ट्राचा वनवास आता संपणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पाची 100 वर्षाहून अधिक काळापासून मागणी होत आहे.
म्हणजेच ब्रिटिशांच्या काळापासून या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी पाठपुरावा केला जात आहे. पण, ब्रिटिशांच्या राजवटीतही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि स्वातंत्र्याची इतकी वर्ष उलटल्यानंतरही विविध सरकारांनी या प्रकल्पाकडे सपशेल दुर्लक्ष केले. पण 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या तिसऱ्या कार्यकाळात हा शंभर वर्षांचा वनवास संपवला आहे.
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला काल झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या रेल्वेमार्गासाठी सर्वप्रथम ब्रिटिश काळात म्हणजेच 1908 मध्ये पहिले सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते.
मात्र सर्वेक्षणानंतर त्या काळात या प्रकल्पाचे काम पुढे जाऊ शकले नाही. तदनंतर अनेक वेळा या रेल्वे मार्गासाठी घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात जमिनीवर याचे कामच झाले नाही. मात्र, काल दोन सप्टेंबर 2024 सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 18 हजार 36 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा आहे. यामुळे या दोन्ही राज्यांच्या एकात्मिक विकासात भर पडणार आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पाची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा राहणार हा प्रकल्प ?
हा रेल्वे मार्ग प्रकल्प 39 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. या मार्गाचा रूट मनमाड-मालेगाव-धुळे- नरडाणा-शिरपूर-सेंधवा आणि इंदूर असा राहील. या मार्गाची लांबी सुमारे 309 किलोमीटर एवढी राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव यामुळे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मालेगाव तालुका नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा अन सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला तालुका. पण हा तालुका अजूनही रेल्वेच्या नकाशावर नव्हता.
मात्र, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मालेगाव मार्गे जाणार असल्याने मालेगाव आता रेल्वेशी कनेक्ट होईल आणि यामुळे या भागातील विकासात भर पडणार आहे. या रेल्वे मार्गाचा मालेगावसहित संपूर्ण कसमादेपट्टा अर्थातच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा नव्हे नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील कांदा, डाळिंब, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
सोबतचं हा मार्ग उज्जैनमधील श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांना जोडणार आहे. म्हणजे यामुळे उद्योग, कृषी, शिक्षण, अध्यात्म आणि पर्यटन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा एकात्मिक विकास होणार आहे. या रेल्वेमार्गाची एकूण लांबी 309 किलोमीटर एवढी असून यातील 192 किलोमीटर लांबीचा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे.
या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 18 हजार 36 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा 50% खर्च केंद्रातील सरकार, 25% खर्च महाराष्ट्र राज्य सरकार तसेच 25% खर्च मध्य प्रदेश राज्य सरकार करणार आहे.
रेल्वे मार्ग प्रकल्पाचे प्रमुख फायदे
या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे अविकसित भागात औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. एवढेच नाही तर मनमाडमार्गे मुंबई ते नवी दिल्ली हे अंतर तब्बल 136 किलोमीटर आणि पुणे ते इंदूर हे अंतर 320 किलोमीटरने कमी होणार आहे. सोबतचं जोधपूर, जयपूर, उदयपूर या शहरांमधून सुरत-धुळे मार्गाने दक्षिण भारतात जाणार्या गाड्यांचे अंतर जवळपास 200 किलोमीटरने कमी होणार आहे.