Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता या गाडीचे स्लीपर व्हर्जनही लवकरच रुळावर धावताना दिसणार आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली आणि पाहता-पाहता देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला. यातील तीन गाड्या नुकत्याच काही दिवसांपूर्वी रुळावर आल्या आहेत.
आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात सध्या स्थितीला आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव , मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
आता भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार असे वृत्त हाती आले असून देशातील पहिली स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळणार असा दावा देखील केला जात आहे. नक्कीच प्रसार माध्यमांमध्ये जो दावा केला जातोय तसे जर घडले तर महाराष्ट्रासाठी ही मोठी भेट ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी येत्या तीन महिन्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेन रूळावर धावणार अशी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनची झलक सुद्धा दाखवली आहे.
पण देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार याबाबत मंत्रिमहोदयांनी कोणतीच अपडेट दिली नाही. अशातच आता मीडिया रिपोर्ट मध्ये या प्रकारातील पहिली गाडी महाराष्ट्राला मिळणार असे बोलले जाऊ लागले आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?
भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या तीन महिन्यात सुरु होईल. ही गाडी मुंबई ते दिल्लीदरम्यान चालवली जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे 9 ऑगस्ट रोजी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 130 किमी प्रतितास वेगाने 20 डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी पार पडली आहे.
तसेच, मुंबई ते दिल्ली दरम्यान 160 किमी प्रतितास वेग क्षमता असलेल्या मिशन रफ्तार प्रकल्पाचे कामही जवळपास पूर्ण होत आले आहे. म्हणून आता देशातील पहिली वंदे भारत स्लीपर मुंबई ते दिल्ली या मार्गावर चालवली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग हा सर्वात व्यस्त मार्ग आहे. या मार्गावर सुरू असणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच तुम्हाला गर्दी पाहायला मिळते. या मार्गावरील एक्सप्रेस गाड्या नेहमीच हाउसफुल धावतात. हे देखील एक कारण आहे की या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल अशी आशा बळावू लागली आहे.
मुंबई-दिल्ली प्रवासाचा वेळ किती तासांनी कमी होणार?
मुंबई दिल्ली मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईलच हे काही फिक्स नाही. पण जर ही गाडी सुरू झाली तर या प्रवासाचा कालावधी चार तासांनी कमी होणार आहे. सध्या या मार्गावर सुरू असणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 16 तास लागतात.
पण जेव्हा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवास कालावधी 12 तासांवर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रवासाचे चार-पाच तास वाजतील. तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर हे राजधानी एक्सप्रेस सारखेच राहणार आहेत.