Maharashtra Railway News : दिवाळीचा सण मात्र चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. सालाबादाप्रमाणे यंदाच्या दिवाळीतही मोठ्या प्रमाणात शहरात वसलेली जनता आपल्या गावाकडे मार्गक्रमण करणार आहे. सणासुदीच्या काळात शहरात स्थायिक झालेले लोक आपल्या गावाकडे सण साजरे करण्यासाठी जातात. गावी जाऊन सण साजरा करण्याची मजा काही औरच असते.
मात्र सणासुदीच्या काळात गावी जाताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वसामान्यांना खिशाला परवडणारा रेल्वेचा प्रवास या काळात क्लिष्ट बनतो. रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामुळे अनेकांना रेल्वेचा प्रवास करता येत नाही. रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने खाजगी बसेसने नागरिकांना प्रवास करावा लागतो.
यामुळे सणासुदीतच सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागते. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार मुंबई आणि पुण्यातून नागपूर तसेच कोल्हापूरसाठी विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे या गाड्यांसाठी 14 ऑक्टोबर पासूनच तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. यामुळे जर तुम्हालाही दिवाळीमध्ये गावाकडे जायचे असेल तर तुम्ही आय आर सी टी सी च्या अधिकृत संकेतस्थळावरून या गाड्यांसाठी तिकीट बुकिंग करू शकणार आहात. आता आपण मध्य रेल्वेने सुरू केलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सी एस एम टी-नागपूर विशेष सुपरफास्ट ट्रेन
राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान सणासुदीच्या काळात विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी द्वी साप्ताहिक राहणार आहे म्हणजेच आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. ही गाडी सीएसएमटी ते नागपूर दरम्यान 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत दर सोमवारी आणि गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 00.20 वाजता रवाना होणार आहे आणि त्याच दिवशी 15:20 वाजता उपराजधानी नागपूरला पोहोचणार आहे.
तसेच नागपूर ते सीएसएमटी विशेष सुपरफास्ट ट्रेन 21 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी आणि शनिवारी नागपूर येथून 13:30 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी राजधानी मुंबई येथे 4:10 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार Nagpur-Pune विशेष साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या काळात दर गुरुवारी चालवली जाणार आहे.
ही नागपूर येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता सांस्कृतिक राजधानी पुण्यात पोहोचणार आहे. तसेच पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष सुपरफास्ट ट्रेन २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी पुण्यावरून १६.१० वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता संत्रा नगरी नागपुरला पोहोचणार आहे.
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेनला या मार्गावरील वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि उरळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.
सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा धावणार
याशिवाय मध्य रेल्वेने कोल्हापूर ते मुंबई दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस या सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही गाडी कोल्हापूर ते मुंबई पर्यंत थेट चालवली जाणार नाही. ही गाडी सध्या कोल्हापूर ते पुणे दरम्यान चालवली जाणार आहे. यामुळे पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे हा प्रवास पुन्हा एकदा सुपरफास्ट होईल आणि रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.