Maharashtra Railway News : वंदे भारत एक्सप्रेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर, ही एक्सप्रेस ट्रेन सध्या देशातील 34 मार्गांवर सुरू आहे. यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. म्हणजे आतापर्यंत राज्याला सहा वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. यापैकी चार वंदे भारत ट्रेन राजधानी मुंबईवरून धावत आहेत.
मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गांवर सध्या स्थितीला वंदे भारत ट्रेन सुरूत आहे. दरम्यान मुंबई ते गोवा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
ऐन सणासुदीच्या काळातच या एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. या बदलाचा मात्र या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा मिळणार आहे. खरंतर ही गाडी सुरू झाली तेव्हा कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लावले होते. मान्सून वेळापत्रकामुळे ही गाडी आठवड्यातून फक्त तीन दिवस धावत होती.
शिवाय या गाडीचा वेग देखील कमी करण्यात आला होता. आज पासून मात्र हे मान्सून वेळापत्रक हद्दबाहेर होणार आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर नॉन मान्सून वेळापत्रक सुरू केले जाणार आहे. या नॉन मॉन्सून वेळापत्रकानुसार आता मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
आज पासून अर्थातच एक नोव्हेंबर 2023 पासून या नॉन मान्सून वेळापत्रकाची अंमलबजावणी होणार अशी माहिती कोकण रेल्वेच्या माध्यमातून समोर आली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
प्रवासाच्या वेळेत होणार 2 तासांची बचत
आतापर्यंत मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा हा प्रवास दहा तासात पूर्ण करत होती. पण आज पासून नॉन मॉन्सून वेळापत्रक लागू होणार असल्याने या गाडीचा वेग वाढणार आहे. त्यानुसार आता ही गाडी फक्त 7 तास आणि 45 मिनिटात हा प्रवास पूर्ण करणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल दोन तासांची बचत होणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक ?
नॉन मॉन्सून वेळापत्रकानुसार आता ही गाडी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी मडगाव येथे पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी मडगाव येथून सुटेल आणि रात्री दहा वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचणार आहे.