Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने 16 अनारक्षित रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालवल्या जाणार आहेत.
भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबरला असतो. या दिवशी दादर येथील चैत्यभूमीवर जगभरातील भीम अनुयायी गर्दी करत असतात.
येथे लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. महामानवाच्या दर्शनासाठी महापरिनिर्वाणदिनी यावर्षीही मोठी गर्दी होणार आहे.
दरम्यान या लाखो लोकांना, आंबेडकरवादी जनतेला महामानवाला अभिवादन देण्यासाठी जाताना सुविधा व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने 16 अनारक्षित गाड्या चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-नागपूर, मुंबई-अजनी, मुंबई-अमरावती, आलिदाबाद-दादर यादरम्यान या विशेष अनारक्षित गाड्या चालवल्या जाणार आहे. दरम्यान, आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात सुरू होणार विशेष रेल्वे गाड्या
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर 2023 रोजी नागपूर मुंबई विशेष गाडी नागपुर येथून रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी रवाना होणार आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी अजनी मुंबई विशेष गाडी अजनी येथून दुपारी दीड वाजता रवाना होणार आहे.
5 डिसेंबर 2023 रोजी अमरावती मुंबई विशेष गाडी अमरावती येथून संध्याकाळी पावणेसहा वाजता रवाना होणार आहे. तसेच, 6 डिसेंबर 2023 रोजी दुपारी पावणे पाच वाजता मुंबई-अजनी विशेष गाडी मुंबईहुन रवाना होणार आहे.
6 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा 35 वाजता मुंबई-सेवाग्राम ही विशेष गाडी मुंबई येथून रवाना होणार आहे. 7 डिसेंबर 2023 रोजी रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी दादर-अजनी रेल्वे दादर येथून सुटणार आहे.
आठ डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी मुंबई-नागपूर विशेष गाडी मुंबई येथून सुटणार आहे. तसेच 8 तारखेला रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी आणखी एक विशेष गाडी नागपूरसाठी मुंबई येथून सुटणार आहे.
शिवाय पाच डिसेंबर 2023 रोजी सकाळी सात वाजता आदिलाबाद-दादर विशेष गाडी आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. तसेच सात डिसेंबर 2023 रोजी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी दादर-आदीलाबाद विशेष गाडी दादर येथून रवाना होणार आहे.