Maharashtra Onion Rate : नुकताच दिवाळीचा सण साजरा झालाय. दरम्यान, दिवाळी सणाच्या काळात बंद असणाऱ्या राज्यातील अनेक बाजार समित्या पुन्हा एकदा शेतीमालाच्या लिलावासाठी सुरू झाल्या आहेत.
दिवाळीनंतरच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला आहे. आज राज्यात कांद्याला कमाल 6500 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
येथील बाजारात आज 100 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली होती. या कांद्याला आज येथे किमान 3000, कमाल 6500 आणि सरासरी 5500 असा दर मिळाला आहे. फक्त वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येचं असा विक्रमी भाव मिळाला असे नाही तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज कांद्याला चांगला जबरदस्त दर मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2471 क्विंटल कांदा आवक झाली होती. या कांद्याला कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज किमान 1000, कमाल 6300 आणि सरासरी 3000 असा दर मिळाला आहे. याव्यतिरिक्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आज कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.
पुणे एपीएमसी मध्ये आज 6701 क्विंटल कांदा आवक झाली असून आजच्या लिलावात कांद्याला किमान दोन हजार, कमाल 5500 आणि सरासरी 3750 असा दर मिळाला आहे. खरे तर दिवाळीच्या काळात राज्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
पण आता पुन्हा एकदा बाजार समिती सुरू झाल्या असून बाजारात कांद्याला चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव फारच समाधानी असून सध्या मिळत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नुकसान सहन करावे लागले होते ते नुकसान भरून काढता येईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या नवीन कांद्याची बाजारात फारसे आवक होत नाहीये. यामुळे कांद्याचे दर कडाडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत मोठ्या प्रमाणात नवीन कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत हे दर असेच कायम राहण्याची शक्यता आहे.