Maharashtra Onion Rate : सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा पर्व मोठ्या धामधुडाक्यात आणि आनंदात साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गणेश चतुर्थी पासून अर्थातच 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून 28 सप्टेंबर अर्थातच अनंत चतुर्दशी पर्यंत गणेशोत्सवाचा सण सुरू राहणार आहे. दरम्यान या गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
ही बातमी राज्यातील कांदा उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच खास आहे. कारण की, राज्यात पुन्हा एकदा कांद्याचे बाजारभाव कडाडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंदीच्या छायेत असलेला कांद्याचा बाजार आता तेजीत आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. राज्यात कांद्याचे बाजारभाव तब्बल 5000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल भावापर्यंत पोहोचले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कांद्याला चांगला दर मिळू लागला होता. फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांच्या काळात कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला गेला. यानंतर जुलै महिन्यात कांदा बाजार भावात थोडीशी वाढ झाली होती. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव जुलै महिन्यातही मिळत नव्हता. पण ऑगस्ट महिन्यात परिस्थिती बदलली आणि कांद्याचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. तर सरासरी बाजारभावाने देखील 2500 रुपयांचा टप्पा गाठला होता.
राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळत होता. काही ठिकाणी तर याहीपेक्षा अधिक सरासरी भाव मिळायचा. अशातच मात्र केंद्रशासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पुन्हा एकदा कांद्याचा बाजार मंदीत गेला.
मात्र आता पुन्हा एकदा कांद्याच्या दरात तेजी येऊ लागली आहे. आज अर्थातच 23 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील चंद्रपूर गंजवडी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 5,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज 310 क्विंटल एवढी आवक झाली होती. या बाजारात आज कांद्याला किमान 2500, कमाल 5000 आणि सरासरी 3400 एवढा भाव मिळाला आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात कांद्याच्या भावात विक्रमी वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना गणपती बाप्पा पावला असे सर्वत्र बोलले जात आहे.