Maharashtra Onion Price : काल नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव झालेत. खरे तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव बंद आहेत.
परंतु काल नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव संपन्न झालेत. या मार्केटमध्ये कालचा लिलावात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या लिलावात मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव असून ऐन दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना या विक्रमी बाजारभावामुळे दिलासा मिळत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १० किलो कांदा ५०० रुपये या भावाने विकला गेला आहे.
नरक चतुर्थीच्या मुहूर्तावर झालेल्या लिलावात या बाजारात सहा हजार पिशवी कांद्याची आवक झाली होती. यात चांगल्या प्रतीचा कांदा ५०० रुपये प्रति दहा किलो या भावाने विकला गेला. शेतकऱ्यांकडील कांदा आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात थोडीशी सुधारणा झाल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
पण, कर्नाटक व इतर राज्यात नवीन कांद्याची आवक वाढलीये. यामुळे कांदा बाजार भाव आणखी वाढणार का आणि राज्यातील इतरही बाजारांमध्ये समाधानकारक दर मिळणार का हा मोठा प्रश्न आहे.
तसेच दिवाळीनंतर कांद्याला काय भाव मिळतो याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. दरम्यान, बाजारपेठेत जुन्या कांद्यापेक्षा नवीन कांद्याला मागणी जास्त असल्याने जुन्या कांद्याचे बाजारभाव हे नवीन कांद्यापेक्षा कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मंचर एपीएमसी मधील कांद्याचे बाजार भाव खालील प्रमाणे
गोळा कांद्यास रुपये 4800 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल
सुपर गोळे कांदे १ नंबर : 4500 रुपये प्रति क्विंटल ते 4700 प्रतिक्विंटल
सुपर मीडियम २ नंबर कांद्यास 4200 रुपये प्रति क्विंटल ते 4500 रुपये प्रति क्विंटल
गोल्टी कांद्यास 2800 रुपये प्रति क्विंटल ते 3800 रुपये प्रति क्विंटल
बदला कांद्यास तेराशे रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल