Maharashtra News : यंदा मान्सून अगदी सुरुवातीपासून कमकुवत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात मान्सूनचे जवळपास 12 दिवस उशिराने आगमन झाले. भारताच्या मुख्य भूमीत म्हणजे केरळमध्ये मान्सून उशिराने पोहोचला आणि महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थातच दक्षिण कोकणात देखील मान्सून उशिरानेच आला.
मानसूनला येण्यास विलंब झाला, शिवाय सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच जून महिन्यात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे यंदा दुष्काळ पडणार अशी भीती शेतकऱ्यांना होती. कारण की अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे भारतासह आशिया खंडातील काही देशात कमी पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता.
पण जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भरून निघाली. मात्र जुलै महिन्यात जरी जोरदार पाऊस झाला असला तरी देखील आता गेल्या 17 ते 18 दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पाहायला मिळत आहे. पावसाने या ऑगस्ट महिन्यात मोठा ब्रेक घेतला असल्याने शेतकऱ्यांची काळजाची धडधड वाढू लागली आहे. विशेष म्हणजे पावसाच्या या ब्रेकमुळे आतापर्यंत राज्यातील 3,000 धरणांमध्ये केवळ 61 टक्के एवढा पाण्याचा साठा तयार झाला आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत राज्यातील तीन हजार धरणांमध्ये जवळपास 80 टक्के एवढा पाण्याचा साठा होता. याचाच अर्थ गेल्या वर्षाशी तुलना केली असता आत्तापर्यंत धरणाच्या पाण्याच्या साठ्यामध्ये 19 टक्के एवढी तूट आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या जिल्ह्यात गेल्या वर्षाशी तुलना केली असता धरण साठ्यामध्ये पाण्याची तूट आहे.
औरंगाबाद विभागामध्ये सर्वात बिकट परिस्थिती आहे. मराठवाडा विभागातील बहुतांशी धरणे अजूनही निम्याहून अधिक रिकामी आहेत. मराठवाड्यात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने त्या विभागातील धरणात अपेक्षित पाणी जमा झालेले नाही. राज्यात सुमारे तीन हजार धरणांची १४३० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी पाण्याची क्षमता आहे. यापैकी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये ८८० टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे. म्हणजेच ६१.५८ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षाशी तुलना केली असता मात्र हे प्रमाण 19% कमी आहे.
19% ची ही तूट आतापर्यंतचा पावसाचा ब्रेक पाहता खूपच अधिक भासू लागली आहे. आगामी काळात जर चांगला पाऊस झाला नाही तर ही तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाने 15 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील सर्व धरणे भरतील असा आशावाद व्यक्त केला आहे. पण जर आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर ही धरणे भरणार नाहीत आणि यामुळे मोठी पाण्याची टंचाई भासू शकते. दरम्यान आता आपण विभाग निहाय धरणांमधील आतापर्यंत जमा झालेला पाण्याचासाठा जाणून घेणार आहोत.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यातील पुणे विभागात ३२४.१२६ टीएमसी एवढा पाण्याचा साठा असून ७३.७६ टक्के धरणे भरली आहेत. नागपूर विभागात मात्र ८४.५३ टीएमसी पाण्याचा साठा असून ६९.१३ टक्के धरणे भरली आहेत. अमरावती विभागात ५४.२० टीएमसी पाण्याचा साठा असून ६४.९४ टक्के धरणे भरली आहेत.
औरंगाबाद विभागात ६०.६४ टीएमसी पाण्याचा साठा तयार झाला असून ३८.०७ टक्के धरणे भरली आहेत. नाशिक विभागातील धरणात ८९.७१ टीएमसी एवढा पाण्याचा साठा असून ६८ टक्के एवढी धरणे भरली आहेत. कोकण विभागात ८०.३२ टीएमसी एवढा पाण्याचा साठा धरणांमध्ये जमा झाला असून आत्तापर्यंत ८९.०७ टक्के धरणे भरली आहेत.