Maharashtra News : अलीकडील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर नागरिकांसाठी फायद्याचा ठरत असून यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शासनाने देखील नागरिकांच्या सोयीसाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सर्वच महत्त्वाची दस्ताऐवज ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहेत.
यामध्ये महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागाने देखील मोठी कौतुकास्पद अशी कामगिरी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने ऑनलाईन सातबारा उतारा, नमुना नंबर आठ अ उतारा, फेरफार उतारे यांसारखे महत्त्वाचे कागदपत्रे नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहेत.
विशेष बाब म्हणजे हे उतारे डिजिटल स्वाक्षरी सोबत येत असल्याने या उताऱ्यांचा वापर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या शासकीय, नीमशासकीय, बँकिंग कामांसाठी केला जात आहे. दरम्यान आता भूमी अभिलेख विभागाने राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी अजून एक कौतुकास्पद असं काम केलं आहे. आता विभागाच्या माध्यमातून सर्वे नंबर निहाय गावाचा नकाशा संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या या नवीन सुविधेमुळे गावात जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुःसीमा, आजूबाजूचे गटनंबर आणि मालक कोण यांसारखी इत्यंभूत माहिती केवळ एका क्लिकवर शेतकऱ्यांसहित नागरिकांना उपलब्ध होत आहे. या सुविधेसाठी भूमी अभिलेख विभागाने इस्रोच्या मदतीने सॅटेलाईट इमेज घेऊन जिओरेफरन्स मॅपच्या आधारे गाव नकाशा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी संलग्न म्हणजेच लिंक केला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची खरेदी आणि दस्तनोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
म्हणजेच आता जमिनीचा नकाशा शोधण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी कोणत्याच कार्यालयात हजेरी लावण्याची आणि पायपीट करण्याची गरज शेतकऱ्यांना भासणार नाही. आता सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक झाला आहे. अशा परिस्थितीत आता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील, तालुक्यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांश-रेखांशसह सर्व माहिती सहजरीत्या उपलब्ध होण्यास मदत होत आहे.
कसा पाहणार जमिनीचा नकाशा?
आता शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाला आहे. यासाठी mahabhumi.gov.in या भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकऱ्यांना भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर महाभू नकाशा या पर्यायावर शेतकऱ्यांना क्लिक करावे लागणार आहे. यानंतर संबंधित शेतकऱ्यांना आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
यानंतर गाव नकाशा पर्यायावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण गावाचा नकाशा त्याठिकाणी ओपन होईल आणि मग संबंधित शेतकऱ्याला आपला सर्वे नंबर प्रविष्ट करून आपल्या जमिनीचा नकाशा पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल. पीडीएफ स्वरूपात नकाशा उपलब्ध असून या नकाशाची प्रिंटआऊट देखील संबंधी शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
यामुळे कोणत्याही शासकीय कामात जमिनीच्या नकाशाची आवश्यकता असल्यास शेतकऱ्यांना याचा उपयोग देखील करता येणार आहे. निश्चितच भूमी अभिलेख विभागाने सुरू केलेली ही सुविधा शेतकरी हिताची असून यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा नकाशा प्राप्त करण्यासाठी कुठेच वनवन भटकण्याची गरज राहणार नाही.