Maharashtra New Vande Bharat Express : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नजीकच्या भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होणार अशी शक्यता आहे. दरम्यान प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि सोयीचा भाव यासाठी भारतीय रेल्वे देखील नेहमीच प्रयत्नशील राहत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
याचेच एक उत्तम उदाहरण आहे वंदे भारत एक्सप्रेस. प्रवाशांना जलद गतीने आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झाली आहे. या ट्रेनमुळे रेल्वेचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक सुपरफास्ट झाला आहे.
शिवाय आरामदायी देखील झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेसच्या तुलनेत काहीसे अधिक आहेत, मात्र आरामदायी आणि जलद प्रवास यामुळे तिकीट दर अधिक असतानाही अनेकजण वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाला पसंती दाखवत आहेत.
सध्या देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन सुरू झाली आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई ते नागपूर आणि इंदोर ते नागपूर या आठ महत्त्वाच्या मार्गांवर या हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
विशेष बाब अशी की महाराष्ट्राला नजीकच्या भविष्यात आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
मीडिया रिपोर्टनुसार, नजीकच्या भविष्यात पुणे ते शेगाव, मुंबई ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
विशेष बाब अशी की यातील मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही पुण्यामार्गे धावणार आहे. अर्थातच नजीकच्या भविष्यात पुणेकरांना अनेक मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच पुणेकरांचा रेल्वे प्रवास हा सोयीचा होणार आहे.