Maharashtra New Vande Bharat Express : केंद्रातील मोदी सरकार दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राला मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. सध्या महाराष्ट्रसहित संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. उद्यापासून अर्थातच 15 ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. हा उत्सव पुढील नऊ दिवस सुरू राहणार आहे.
24 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे आणि याच दिवशी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा होणार आहे. यानंतर पुढल्या महिन्यात 12 नोव्हेंबरला दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दिवाळीचा मोठा सण आनंदात साजरा केला जाणार आहे. दरम्यान या सणासुदीच्या काळातच सर्वसामान्य जनतेसाठी केंद्रातील मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशात एकूण 9 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत. विशेष बाब अशी की यापैकी तीन वंदे भारत एक्सप्रेस आपल्या महाराष्ट्रातून चालवल्या जाणार आहेत. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. वास्तविक, पुढील वर्षी देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
हेच कारण आहे की निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजु लागले आहेत. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी केंद्रातील सरकारकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. याच निर्णयाचा एक भाग म्हणून देशाला 9 वंदे भारत एक्सप्रेसची सौगात दिली जाणार आहे. सध्या स्थितीला देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातात. आतापर्यंत आपल्या राज्यातील एकूण 5 मार्गावर ही गाडी सुरू होती. मात्र 9 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इंदोर ते भोपाळ दरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस थेट नागपूरपर्यंत चालवण्यासं रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आता सहा एवढी झाली आहे.
सध्या राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर आणि इंदूर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर ही ट्रेन सुरू आहे. दरम्यान आता महाराष्ट्राला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार दिवाळीच्या मुहूर्ताला देशातील नऊ महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरु केली जाणार आहे. या 9 पैकी 3 वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेला मिळणार आहेत. मुंबई ते कोल्हापूर, जालना ते मुंबई आणि पुणे ते सिकंदराबाद या तीन मध्य रेल्वेच्या मार्गांवर ही गाडी चालवली जाणार आहे. तूर्तास याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत खूपच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवरात्र उत्सवाच्या आधी 35 वी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. ही गाडी उत्तर प्रदेश मधील वाराणसी ते झारखंड मधील टाटानगर दरम्यान चालवली जाणार आहे.