Maharashtra New Scheme : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारल्यानंतर महायुती सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेची नाराजी आणि महायुती सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला. यामुळे ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने आपला ओव्हर कॉन्फिडन्स कमी करण्याचा निर्णय घेतला असून जनतेची नाराजी दूर करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली जात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अशा अनेक कल्याणकारी योजना महायुती सरकारने जाहीर केल्या आहेत.
विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या योजनांना खूपच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बॅकफूटवर असणारे शिंदे सरकार आता या योजनांमुळे फ्रंट फूट वर येऊन बॅटिंग करत आहे. यामुळे शिंदे सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे.
दरम्यान आता राज्यातील शिंदे सरकारने तरुणांसाठी आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने तरुणांसाठी मुख्यमंत्री योजनादूत नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.
तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारच्या या कार्यक्रमा अंतर्गत मुख्यमंत्री योजना दूत म्हणून 50 हजार तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे.
या नियुक्त करण्यात आलेल्या तरुणांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. यासाठी तरुणांना दरमहा मानधन दिले जाणार आहे. या कामासाठी तरुणांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत.
मात्र या कामाला शासकीय कामाचा दर्जा राहणार नाही. तथापि या कार्यक्रमासाठी सरकारकडून 300 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक योजनादूत अन शहरी भागात 5000 लोकांमागे एक योजनादूत नियुक्त केला जाणार आहे.
यासाठी पदवीधारक उमेदवार पात्र राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यासाठी पात्र राहतील अशी माहिती देण्यात आली आहे. 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहे.
मात्र शिंदे सरकारने सुरू केलेला हा कार्यक्रम फक्त सहा महिन्यांसाठी राहणार आहे. म्हणजेच नियुक्त तरुणांना फक्त सहा महिने काम मिळणार आहे. सहा महिन्यानंतर हा कार्यक्रम बंद होणार आहे.