Maharashtra New Ring Road Project : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक सुधारित व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले आहेत. या प्रयत्नांमुळे राज्यातील अनेक भागांमधील रस्ते वाहतूक सुधारित झाली आहे. राज्यात सध्या विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसात काही रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत. पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाचा देखील यामध्ये समावेश होतो.
याशिवाय राज्यातील नाशिक शहरात देखील रिंग रोड चे काम केले जाणार आहे. दरम्यान या प्रस्तावित रिंग रोड संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिक हे राज्यातील एक महत्त्वाचे कृषी, औद्योगिक आणि धार्मिक केंद्र आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आगामी काळात नाशिक शहरात कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. शहरात प्रत्येक बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होते. कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात संपूर्ण जगभरातील सनातन भाविक हजेरी लावत असतात.
कुंभमेळ्याला हिंदू धर्मातील लोकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येतो. दरम्यान हाच प्रश्न निकाली काढण्यासाठी शहरात प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोडच्या कामाला गती देण्यासाठी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली होती.
ही बैठक सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री दादा भुसे यांनी नाशिक रिंग रोड प्रकल्पाचे काम जलद गतीने करावे अशा सूचना दिल्या आहेत.
या बैठकीत या प्रकल्पाची सद्यस्थिती, सादरीकरण इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात आला. अशा परिस्थितीत आता आपण नाशिक रिंग रोड प्रकल्प नेमका कसा आहे, याचा रूट मॅप कसा आहे हे समजून घेणार आहोत.
कसा आहे नाशिक रिंग रोड प्रकल्प
नाशिक- पुणे, नाशिक- वलसाड, मुंबई- नाशिक, नाशिक- मालेगाव हे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग नाशिक शहरातून जातात. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. हीच वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
हा मार्ग ६५.४१ किलोमीटर लांबीचा आहे. तसेच या प्रस्तावित रिंग रोड ची रुंदी ६० मीटर एवढी आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी ४००.९३ हेक्टर जमिनीची आवश्यकता राहणार आहे.
तसेच या प्रकल्पासाठी अंदाजित २६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पासाठी विविध पर्यायी आखणीचा सविस्तर अभ्यास करून प्रकल्पाची आखणी अंतिम करण्याबाबतची कारवाई सध्या सुरू आहे.
यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या आधी या प्रकल्पाचे काम पूर्ण करून शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे.