Maharashtra New Railway Station : गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने तसेच कोणत्याही शहरात रेल्वेने सहजतेने जाता येत असल्याने रेल्वे प्रवासाला विशेष महत्त्व दिले जात आहे.
दरम्यान, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ठाणे नजीक एक नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहे. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील मोठा भार कमी होणार अशी आशा व्यक्त होत आहे.
खरे तर ठाणे रेल्वे स्थानक हे राज्यातील एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय.
आता मात्र ठाण्याजवळ एक नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड आणि ठाणे या रेल्वे स्थानकादरम्यान हे नवीन स्थानक तयार केले जात आहे.
या नव्याने विकसित होत असलेल्या रेल्वे स्टेशन मुळे ठाणे स्थानकातील बहुतांशी भार कमी होणार आहे. घोडबंदर रोड, वाघळे इस्टेट आणि पोखरण या भागातील रेल्वे प्रवाशांना थेट ठाणे स्थानकावर येण्याची गरज राहणार नाही.
नव्याने विकसित होत असलेल्या या स्थानकावरुन आता येथील प्रवाशांना रेल्वेगाडी पकडता येणार आहे. परिणामी त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि पैसाही वाचणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात दररोज 7 लाख प्रवासी ये-जा करत असतात. अशा परिस्थितीत, येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, प्रवाशांची हीच कोंडी दूर करण्यासाठी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्थानक तयार केले जात आहे. हे स्थानक 14.83 एकर जागेवर तयार होणार आहे.
त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला 2 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म तयार होणार आहेत आणि एक होम प्लॅटफॉर्म राहणार आहे.
या स्थानकात प्रवाशांसाठी तीन पादचारी पूल तयार केले जाणार आहेत. दरम्यान या स्थानकाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती समोर आली आहे.