Maharashtra New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांमुळे देशातील रस्ते वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे.
अनेक शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यात शासन आणि प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा-जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे दिसते. यामुळे देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला जाणे सोयीचे झाले आहे.
महामार्ग प्रकल्पांच्या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होतोय. अशातच आता देशाला आणखी एक रस्ते प्रकल्पाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. 12 नोव्हेंबरला सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचा रस्ते प्रकल्प सुरू केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे च्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 12 तारखेला होणार आहे. खरे तर मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. दिल्ली ते मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी सध्या 24 तासांचा वेळ खर्च करावा लागतोय. परंतु जेव्हा हा महामार्ग प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा प्रवासाचा कालावधी 12 तासांवर येण्याची शक्यता आहे.
यामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता याच महामार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा आता वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे.
खासदार महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे, या एक्सप्रेसवेवर सहा लेन आहेत आणि आग्रा कालवा आणि गुडगाव कालव्यावर दोन नवीन पूलही बांधले गेले आहेत. आता हा एक्स्प्रेस वे आणि पूल येत्या 12 तारखेला सुरू होणार आहेत.
हा मार्ग सुरू झाल्याने मथुरा रोडवरील जाम पूर्णपणे सुटणार आहे. तसेच, हा केवळ पर्यायी मार्ग नसून मथुरा रोडवरील अवजड वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय राहणार अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
यमुना नदीच्या काठावरील यमुना खादर, ओखला विहार आणि बाटला हाऊस सारख्या गजबजलेल्या भागातून हा रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा खालचा भाग महाराणी बागेजवळ बांधण्यात आला असून तो DND उड्डाणपुलाच्या आश्रम प्रवेशद्वाराजवळील रस्ता ओलांडून जाणार आहे.
सध्या महाराणी बागेतून सोहना येथे पोहोचण्यासाठी अडीच तासांचा वेळ लागतोय, मात्र जेव्हा हा एक्स्प्रेस वे सुरू होईल तेव्हा हा वेळ केवळ २५ मिनिटांवर येणार आहे. या मार्गावर वाहनांना 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने जाता येणार आहे.