Maharashtra New Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यावेळी पीएम मोदी शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग, ठाणे खाडी पुल कॉरिडॉर, समृद्धी द्रुतगती मार्गाचा अंतिम टप्पा यां तीन महत्त्वाकांक्षी आणि मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
तसेच ठाणे रिंग रोड प्रकल्पाची पायाभरणी देखील केली जाणार आहे. ज्या भूमिगत मेट्रो मार्गाची वाट पाहिली जात होती त्याची आता मुंबईकरांना भेट मिळणार आहे. मेट्रो मार्ग 3 या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच आरे ते बीकेसी हा 12 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. या पहिल्या टप्प्यात दहा स्थानके विकसित करण्यात आली आहेत.
खरे तर हा संपूर्ण मेट्रो मार्ग 33.5 किलोमीटर लांबीचा आहे. या संपूर्ण मेट्रो मार्गावर एकूण 27 स्थानके तयार केली जाणार असून यापैकी 26 स्थानके भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवरील राहणार आहे. येत्या काही दिवसांनी या प्रकल्पाचा पहिला फेज सुरू होणार आहे आणि नंतर जून 2025 पर्यंत या प्रकल्पाचा दुसरा सुरू केला जाईल.
या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा 4 ऑक्टोबरला सुरू केला जाणार अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. यामुळे मुंबईकरांचे भूमिगत मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार हे स्पष्ट होत आहे. खरे तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी तीन आणि पाच ऑक्टोबर ही तारीख विचारात घेतली गेली होती.
मात्र पीएमओ ऑफिस कडून चार ऑक्टोबर ही तारीख फायनल करण्यात आली आहे. आता या तारखेला मुंबईला पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. एवढेच नाही तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प आहे.
या प्रकल्पाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे. सुरुवातीला डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
मग 2024 मध्ये म्हणजेच या चालू वर्षात या प्रकल्पाचा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा अर्थातच भरवीर ते इगतपुरी हा तिसरा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. आता या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले आहे.
यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्षांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, समृद्धी द्रुतगती मार्गाचा एक कॅरेजवे सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.
यानंतर 4 ऑक्टोबरला या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. म्हणजे वाहनचालकांना ऑक्टोबरपासून मुंबई ते नागपूरपर्यंतचा संपूर्ण प्रवास या एक्स्प्रेसवेने करता येणार आहे. हा एक्स्प्रेसवे 701 किमी लांबीचा असून शेवटचा टप्पा 76 किमीचा आहे.