Maharashtra New Expressway : नागपूर ते मुंबई दरम्यान विकसित होणाऱ्या समृद्धी महामार्ग संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केले जात असून आत्तापर्यंत तीन टप्प्यात नागपूर ते इगतपुरी दरम्यान चा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. यानंतर 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. तसेच, 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.
म्हणजेच आतापर्यंत या महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. दरम्यान उर्वरित इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये हा टप्पा सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता केवळ पेंटिंग, सूचना फलक लावणे आदी किरकोळ अन फायनल टच देणारी कामे सुरू आहेत.
यामुळे नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच हा टप्पा सुरू होणार असे दिसते. हा टप्पा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी नुकतीच दिली आहे.
समृद्धीचा अखेरचा टप्पा विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता; मात्र आमने-वडपे टप्प्यात असलेल्या गोदामामुळे हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ऑक्टोबरचा मुहूर्त हुकला होता.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आमने-वडपे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साडेचार किलोमीटर मार्गाचे कामही एमएसआरडीसीने पूर्ण केले आहे.
यामुळे आता नव्या वर्षात हा संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असून यामुळे नाशिक ते भिवंडी हा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. तसेच नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होणार आहे.
सध्या नाशिक-ठाणे या मार्गावर प्रवास करण्यासाठी सुमारे पाच-सहा तास लागतात; मात्र समृद्धी मार्गाचा चौथा टप्पा सेवेत आल्यानंतर नाशिक-भिवंडी हा प्रवास केवळ दोन तासांत होऊ शकणार आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.