Maharashtra New Expressway : दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प ठरणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे देशाची आर्थिक राजधानी आणि राष्ट्रीय राजधानी एकमेकांना जोडले जाणार आहेत.
यामुळे मुंबई ते दिल्लीदरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. हा महामार्ग पूर्णत्वाला गेल्यानंतर मुंबई ते दिल्लीचा प्रवास अवघ्या बारा तासात पूर्ण होऊ शकतो असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास करण्यासाठी 24 तासांचा वेळ लागतो. अर्थातच हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास कालावधी निम्म्याने कमी होणार आहे. दरम्यान आता याच महामार्गाच्या कामासंदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता राष्ट्रीय राजधानीतून हरियाणाच्या सोहनाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना यमुना खादर, ओखला विहार आणि बाटला हाऊससारख्या गजबजलेल्या भागात ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्याची गरज राहणार नाही.
कारण की दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे चा एक महत्त्वाचा भाग आता वाहतुकीसाठी सुरू केला जाणार आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा दिल्लीचा भाग येत्या पाच दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे. हा टप्पा १२ नोव्हेंबरपासून जनतेसाठी खुला केला जाऊ शकतो अशी माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
एक्सप्रेसवेचा हा भाग सुरू झाल्याने महाराणी बागेतून सोहना येथे जाण्यासाठी अवघे २५ मिनिटे लागतील. सध्या हा प्रवास सुमारे अडीच तासांत पूर्ण होतो. दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी एक्स्प्रेस वेचा दिल्ली भाग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. खासदार बिधुरी म्हणाले की हा सहा पदरी द्रुतगती मार्ग आणि दोन पूल – एक आग्रा कालव्यावरील आणि दुसरा गुडगाव कालव्यावरील लवकरच खुले होणार आहेत.
पुढे बोलताना त्यांनी हा महामार्ग आणि पूल सुरू झाल्याने मथुरा रोड वाहतूक कोंडीपासून पूर्णपणे मुक्त होईल, असे म्हटले. कॉरिडॉरचा बुलंद भाग यमुना नदीकाठी यमुना खादर, ओखला विहार आणि बाटला हाऊस यांसारख्या गजबजलेल्या भागातून जातो.
महाराणी बागेजवळ डाऊनवर्ड रॅम्प बांधण्यात आला असून तो डीएनडी उड्डाणपुलाच्या आश्रम प्रवेशद्वाराजवळील रस्ता ओलांडून जाईल. बिधुरी म्हणाले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर 5,500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्याचा उपयोग फरीदाबाद, पलवल आणि सोहनाकडे जाण्यासाठी केला जाऊ शकतो.
हा केवळ पर्यायी मार्ग नाही तर यामुळे मथुरा रोडवरील भीषण ट्रॅफिक जॅमच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल. महाराणी बागेतून सोहना येथे पोहोचण्यासाठी अडीच तास लागतात, मात्र हे पूल आणि महामार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ केवळ २५ मिनिटांवर येणार आहे.
मिठापूर ते फरिदाबाद बायपासवरील काली इंटरचेंजपर्यंत दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा २४ किमीचा भाग उद्घाटनासाठी पूर्णपणे तयार असल्याची माहिती खासदार महोदयांनी यावेळी दिली आहे. सेक्टर-३० आत्मदपूर, सेक्टर-२८, बसेलवा कॉलनी, खेडीपुल, बीपीटीपी पुलाजवळ, सेक्टर-२, सेक्टर-२ आयएमटी येथील बायपासवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत.
या सर्व ठिकाणी अंडरपास बनवण्यात आले आहेत. हा विभागही लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे चे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच या महामार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघेल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.